7.3 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव परळीच्या इतिहासातून पुसून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न

◾मतदारसंघात चालणारे अवैध धंदे, लुटमार, दादागिरी, गुंडगिरीला धनंजय मुंडेंचे पाठबळ

◾पातळी सोडून बोलणे बंद करा अन्यथा आम्हालाही पातळी सोडता येते

◾युवक नेते राजेभाऊ फड यांची पत्रकार परिषद सभेतून केलेल्या आरोपांना दिले प्रत्युत्तर

परळी वैजनाथ, महाराष्ट्र आरंभ वृत्त : तुमच्याच घरात आमदारकी, तुमच्याच घरात खासदारकी, तुमच्याच घरात जिल्हा परिषद घेतात? मतदारसंघात दुसरे कोणी नाही का? पालकमंत्री काय ताम्रपत्र घेऊन आलेत का? मुंडे नावाच्या व्यतिरिक्त इतर कोणी कार्यकर्ते नाहीत का? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून आम्ही आमच्या पक्षाला उमेदवारी मागितली. पालकमंत्र्यांनी एका सभेत बोलत असताना विनाकारण आमच्यावर आरोप केले. राजकारण करत असताना कोणीही कोणाच्या कुटुंबावर बोलता कामा नये. मात्र पालकमंत्र्यांनी पातळी सोडून कौटुंबिक टीका केली. त्यांनी असले धंदे थांबवावेत. आमच्यावर पातळी सोडून टीका करणार असतील तर आम्हालाही तशी टीका करता येते असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी दिला. रविवार, दि.17 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी वैजनाथ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी सभेत बोलतांना ज्या बॅनर फाडण्याच्या घटनेचा उल्लेख केला ती घटना त्यांनीच घडवून आणली असून बॅनर फाडणारा त्यांचाच कार्यकर्ता असल्याचे राजेभाऊ फड म्हणाले. पवार साहेबांचे बॅनर फाडणारा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचाच असल्याचे फोटो सदृश्य पुरावेही त्यांनी या पत्रकार परिषदेतून पत्रकारांना दिले.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे राजकारण करीत असताना पातळी सोडून आरोप करतात, लोकांना जाहीर सभेतून धमक्या देतात. त्यांना या कर्माची फळे भोगावी लागणार असून, येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानातून परळी मतदार संघातील जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. पालकमंत्र्यांनी स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव पुसून टाकण्याची भिस्मप्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे त्यांनी आज बीड जिल्ह्यातील भाजपचे कमळ हद्दपार करून टाकले आहे. राजकारणातील उत्तुंग शिखरावरील मुंडे साहेबांचे नाव परळीच्या इतिहासातून पुसण्याचे काम ते आजपर्यंत करत आले आहेत. स्वतःला ते साहेबांचा स्वयंघोषित वारसदार समजतात मात्र तेच स्व.मुंडे साहेबांचे नाव पुसून टाकण्याचा घाट घालत असल्याचेही फड म्हणाले. पालकमंत्र्यांनी पिक विम्यात मोठा घोटाळा केला, जगमित्रा कारखान्यासाठी देवस्थानच्या जमिनी हडप केल्या, घोटाळ्यातील कमावलेला पैसा वापरून ते निवडणुकीत उतरले आहेत. पालकमंत्र्यांनी जनतेचा विकास न करता भ्रष्टाचाराच्या माध्यमातून शेकडो कोटींची माया जमवली. चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीचे शपथपत्र दाखल करतांना पालकमंत्र्यांनी चुकीची आणि खोटी कौटुंबिक माहिती दिली आहे. पाच अपत्यांचा त्यांनी उल्लेख केला मात्र दुसऱ्या पत्नींचा उल्लेख त्यांनी केला नाही? याचा काय अर्थ समजायचा असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

अवैध शस्त्रे बाळगणे, दादागिरी करणे, खून खराबे घडवून आणण्याचा धंदा पालकमंत्र्यांनी सुरू केलेला आहे. लुटमार चालवून मतदानाला पैसा वाटणे बोगस मतदान करून घेण्याचा गैरप्रकार करणाऱ्या पालकमंत्र्यांना घरी बसवल्याशिवाय या मतदारसंघाचं आणि बीड जिल्ह्याच भल होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे एका गावात प्रचारासाठी गेले असता त्यांना प्रचारासाठी विरोध करण्यात आला. विरोध करणारे लोक हे पालकमंत्र्यांनी पाठवलेले गावगुंड होते. मुद्दामहून जातीयवादाचे विष पेरण्याचा पालकमंत्री प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. जनतेला त्यांच्या सर्व गोष्टी माहीत आहेत. येणाऱ्या मतदानातून ते दिसून येईल.

पालकमंत्री टक्केवारीची गुत्तेदारी करतात

परळी विधानसभा मतदारसंघात चालू असलेल्या विकास कामांमध्ये गुत्तेदार यांच्याकडून पालकमंत्री कमिशन घेतात. विकास कामांत टक्केवारीची पद्धत पालकमंत्र्यांनी पाडल्याने इथले विकास कामे बोगस होत आहेत. नगर पालिकेच्या अंतर्गत होणारे तसेच मतदारसंघातील पाणी पुरवठ्याच्या, रस्त्यांच्या कामात प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार पालकमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे चालला असल्याचा घणाघात युवक नेते राजेभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेतून केला.

स्व.पत्रकार दिलीप बद्दर यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार तथा मागील अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्राची निष्ठेने सेवा करणारे पत्रकार दिलीपजी बद्दर यांचे काही दिवसांपूर्वी दुखःद निधन झाले. पत्रकार परिषदेचा समारोप झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी त्यांच्या पावन स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या