कॅशिअरने दिले ग्राहकाच्या अंगावर पैसे फेकून; गेवराईच्या एसबीआय शाखेतील प्रकार
गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला कॅशिअरने अरेरावी केल्याचा प्रकार गुरुवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडला आहे. ग्राहकाचे पैसे फेकून दिल्याने बँकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. ग्राहकाने त्याची ची तक्रार मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेवराई शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कैलास मोरे यांचे खाते आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता ते एक लाख रुपये नगदी भरणा करण्यासाठी गेले होते. कॅशिअर शुभम गायकवाड यांच्याकडे पैसे दिल्यानंतर त्यांने पैसे मोरे यांच्या अंगावर फेकले. येथून बाहेर जा, चलन दुसऱ्या काउंटरवर भरावे लागते. माहिती नाही का, असे अरेरावीची भाषा करून अपमान केला.
दरम्यान एकेकाळी मोरे यांचा उत्तम व्यवहार असल्याबद्दल बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. असे असतानाही बँकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना सापत्न वागणूक मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कॅशिअरची तक्रार मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन करण्यात आली आहे.