स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गेवराई प्रतिनिधी, (महाराष्ट्र आरंभ):– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणारे, अवैध देशी विदेशी दारू विक्री करणारे तसेच त्याची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबवून कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. चकलांबा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या उमापूर पोलीस चौकीच्या परिसरातील गणेश नगर उमापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हातभट्टी दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकून १७ हजार रुपयांचा हातभट्टी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंकुश दीपाचंद जाधव (रा.गणेश नगर उमापूर, ता.गेवराई, जि.बीड) असे हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्याचे नाव आहे. त्याविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आज (दि.३० एप्रिल रोजी) दुपारी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे हे पथकासह चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथे पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की, एक इसम रसायनांच्या सहाय्याने हातभट्टी दारू तयार करून विक्री करत आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज त्याठिकाणी छापा मारला असता, आरोपी तिथे गुळ मिश्रित रसायनाचे सहाय्याने हातभट्टी दारू तयार करत असताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून १७ हजार रुपयांचा रसायन व तयार हातभट्टी दारू जप्त करून आरोपींविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात दारू बंदी कायदा अन्वये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, सफौ तुळशिराम जगताप, पोह चव्हाण, विकास राठोड, बाळु सानप, चालक उलगे यांनी केली आहे.