गेवराई तालुक्यातील सुशी येथील घटना; आगीत लाखोंचे नुकसान दानशूरांनी मदतीसाठी पुढे यावे
गेवराई प्रतिनिधी, (महाराष्ट्र आरंभ):- शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्यासह घरातील अन्नधान्य तसेच वेचणी केलेला कापुस जळून खाक झाल्याची घटना सोमवार दि.१ एप्रिल रोजी सुशी वडगाव येथे घडली असून यामध्ये सदरील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तर पंचनामा करुन देखील अद्यापपर्यंत कुठलीच मदत शेतकऱ्यास मिळाली नाही तरी प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास दानशूरांनी पुढे येवून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथील सुर्यकांत तात्याबा तुरुकमारे यांच्या शेतातील राहत्या घराला अचानक दि.१ एप्रिल २०२४ रोजी आग लागून आगीमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्यासह घरातील वेचणी केलेला कापुस, अन्नधान्य सह आदि जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घरात कुणीही नसल्याने यामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नाही परंतू या घटनेमध्ये सदरील शेतकरी कुटुंबाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. तसेच दानशूर व्यक्तिंनी देखील शेतकरी सुर्यकांत तुरुकमारे यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.