संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा तहसीलदारांना घेराव
माजलगाव दि.१०(प्रतिनिधी):- यंदा पाणी टंचाई जाणवत असल्याने तलाव, धरणातील पाणी साठा जपून वापरला जात आहे. मात्र बीडच्या माजलगाव तालुक्यातील महातपुरी या गावात गोदापात्रातून अवैध पाणी उपसा केला जात असल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत मोटारी देखील जप्त केल्या आहेत.
बीड जिल्ह्यात गतवर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई आहे. यामुळे जिथे पाणी उपलब्ध होईल तिथून उपसा करण्याचे धोरण ग्रामस्थांनी अवलंबले आहे. अशात माजलगाव तालुक्यातील महातपुरी गावात गोदावरी नदीतून पाणी उपसा केला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीवरून अवैध पाणी उपसा थांबवण्यासाठी तहसीलदारांनी सकाळीच त्या ठिकाणी भेट दिली. या पात्रात असलेल्या विद्युत मोटार काढून त्यांचे वायर देखील तोडण्यात आले होते. या ठिकाणी २५ विद्युत पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
मोटार जप्ती केल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी तहसीलदारांची गाडी अडवली. तसेच आमच्या गुरांच्या पाण्यासाठी आम्ही हे पाणी उपसा करतोय. आमच्या मोटार जशाच्या तशा जोडून द्या, अशी मागणी केली. दरम्यान याविषयीची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रकाश सोळुंके यांनी भेट देत ग्रामस्थांची समजूत घातली. तसेच यातून आपण लवकरच मार्ग काढू; असे आश्वासन देखील दिले आहे.