गेवराई दि.१० (प्रतिनिधी):- गेवराईमधून चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असं सांगत दागिने लंपास केलेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आसून पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेवराई शहरात एका डॉक्टरच्या घरामध्ये एका भामट्याने प्रवेश केला. तुमच्या घरातील भिंतीला असलेले डाग आणि भांड्यांवर असलेले डाग मी काढून देतो, असं त्याने डॉक्टरच्या पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याने घरातील भिंतीवरील आणि भांड्यांवरील डाग देखील साफ केले.
भांडी आणि भींत स्वच्छ केल्याने हा व्यक्तीचा कामाचा असल्याचं डॉक्टरांच्या पत्नीला वाटलं. पुढे या व्यक्तीने मी सोने-चांदीचे दागिने देखील चकचकीत चमकवतो असं म्हटलं. त्यावर महिलेने त्याला घरातील सर्व दागिने आणून दिले. दागिने हातात मिळाल्यावर यासाठी लागणारं लिक्विड आणि प्रोसेस येथे होणार नाही, मी दागिने स्वच्छ करून तुम्हाला पुन्हा देतो असं म्हटलं.
त्यानंतर हा व्यक्ती दागिने घेऊन पसार झाला. तो पुन्हा घरी आलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केलीये. दरम्यान संशयित चोरटा कॉलनीमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत.