- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडितांच्या बैठकीला उपस्थिती!
गेवराईत आयोजित केलेल्या बैठकीला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती
◼ नवनाथ आडे I गेवराई
बीड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपने सर्वप्रथम पंकजा मुंडे यांचे नाव जाहीर करत उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली. पंकजा मुंडे यांचा जिल्ह्यात गाठी – भेटीचे सत्र पूर्ण झाले आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत.आता पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रचाराच्या रिंगणात उडी घेत रविवारी गेवराईला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थिती लावली.
बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सानवणे रिंगणात आहेत. आता वंचितनेही विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. ज्योती मेटे यांचेही दौरे सुरु आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बहुतेक तालुक्यांचा दौरा करत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर नेत्यांच्या घरभेटी घेत संवाद साधला. त्यानंतर बुथ प्रमुख, भाजप वॉरियर्सच्या बैठकाही होत आहेत.
दरम्यान, मागच्या आठवड्यात धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाथरा येथे बैठक घेऊन स्नेहभोजन दिले. पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले होते. आता प्रचार रंगात येत असताना रविवार पासून पालकमंत्री धनंजय मुंडे प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ गेवराई येथे माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून बुथ कमिटी आणि गाव निहाय संवाद बैठकांना त्यांनी उपस्थिती लावली. गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकजुटीने पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभी असुन प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून देतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, गेवराई मतदार संघात भाजपचे लक्ष्मण पवार विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण पवार यांच्यासह अमरसिंह पंडित तसेच शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांचीही भेट घेतली होती.