मुलगी नकोशी असणाऱ्या समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे-मनिषा तोकले
-मुलींना घरापासूनच दुय्यमपणाची वागणूक मिळते- -एकता साहित्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला सुर-
शिरूरकासार:-(प्रशांत बाफना)
मुलगी नकोशी असणाऱ्या समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असून मुलींना घरापासूनच दुय्यमपणाची वागणूक मिळत असल्याचे प्रतिपादन महिला किसान अधिकार मंचच्या सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी केले.त्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने गोमळवाडा येथे आयोजित केलेल्या ग्रामीण भागातील वाढते बालविवाह व त्यावरील उपाय या विषयावर आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या.या वेळी परिसंवादात राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तत्वशील कांबळे,बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे,प्राचार्य रामकिशन दहिफळे यांचा सहभाग होता.पुढे बोलताना तोकले म्हणाल्या की,बालविवाह रोखणे काळाची गरज असून घरातील लोकांनी आणि नातेवाईकांनीच संसाराची स्वप्न दाखविल्यामुळे बालविवाह होत असल्याचे विचार व्यक्त केले.समाजातील दूषित वातावरण थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.आपल्या मुलीला पायावर उभे राहण्याचे उद्दिष्ट द्यावे जेणेकरून हुंडा देण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येणार नाही.समाजाने पुरुषप्रधान संस्कृती मध्ये मुलींना दुय्यम स्थान देत मुलांच्या चुकांना पाठबळ दिल्यामुळेच अराजकता निर्माण झाल्याचे देखील त्यांनी अधोरेखित केले.तत्वशील कांबळे यांनी आपले विचार मांडताना सांगीतले की,युनिसेफच्या आकडेवारीत 42% बालविवाहाची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात मात्र 60% बालविवाह होत आहेत.बालविवाहाला विरोध करण्यासाठी स्वतः मुलींनी पुढाकार घ्यायला हवा.सोशल मीडियावर बदनामी होण्याच्या भीतीपोटी मुली बळी पडत असून त्यांनी अवांतर गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या करिअर वर लक्ष केंद्रित करण्याचे मत व्यक्त केले.बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की,ग्रामीण भागात बालविवाहाला विरोध करणे म्हणजे जन्माची दुष्मनी लावून घेतल्यासारखे असल्याचा गैरसमज आहे.बालविवाह लावून देताना नातेवाईक खूष होतात परंतू तो उघडकीस आला की लगेच चिंता निर्माण करतात. मुलीला माणूस म्हणुन वागविल्या जात नाही हि सामाजिक शोकांतिका असून आपल्या मुलाला भविष्यात मुलगी मिळणार नाही या भितीपोटी मुलांचे आईबाप बालविवाह करत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.ज्या मुलीला घरात प्रेम मिळत नाही ती मुलगी नाविलाजाने बाहेरचे प्रेम शोधत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.शेवटी पुरुषांना प्रेमाचा व्यवहार कळत नसल्याचे सांगत स्त्रियांच्या प्रगतीची सवय पुरुषांना लागायला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला