माजोरड्या सत्तेचा अंधारात कारभार,
पारंपारिक मच्छीमारांवर अकाळी उपासमार ?
परमेश्वर घुंगासे | विशेष वृत्त
पैठण येथील जगप्रसिद्ध धरणावर तसेच संरक्षीत असलेल्या पक्षी अभयारण्य क्षेत्रात शासनाकडून तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात आहे.येथील गरीब कष्टकरी कामगार वर्ग ज्यांचा रोजचा उदरनिर्वाह याच तलावावर चालतो त्यांच्या पोटावर शासन सत्तेच्या जोरावर पाय देत असल्याचा उद्विग्न सवाल येथील कहार आणि भिल्ल समाजाच्या वतीने विचारला जातोय,मात्र विविध विभागाच्या परवानग्या देखील या प्रकल्पासाठी मिळाल्या असल्याचे वृत्त आहे.जायकवाडी च्या धरण क्षेत्रात सभोवतालच्या अनेक जिल्ह्यातील तब्बल बावीस हजार मच्छीमारांचे उदरनिर्वाह चालते, या प्रकल्पाने मासेमारीवर बंधने येतील आणि भुकेचा प्रश्न गंभीर होऊन बावीस हजार कुटुंब थेट उघड्यावर पडतील यात तिळमात्र शंका नाही! या सह अनेक विपरीत परिणाम या प्रकल्पाने होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कहार भोई आणि भिल्ल समाजाच्या वतीने काही आठवड्यापूर्वी पैठण तहसील कार्यालयावर हजारोंच्या जनसमुदायाने मोर्चा काढला होता तरीही शासन स्तरावर मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे एवढ्या गंभीर प्रश्नाबाबत शासनाने या संबंधित कुणालाही विश्वासात न घेता प्रकल्पाची माहिती अथवा परवानग्या गुपित का ठेवल्या ? असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो !
जायकवाडी धरण क्षेत्र राखीव पक्षी अभयारण्य म्हणून देखील पर्यटकांसाठी हमखास आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे सौर ऊर्जा प्रकल्पाने नैसर्गिक जैव विविधतेवर गदा येण्याची शक्यता असल्याचे येथील पक्षी प्रेमी आणि पर्यावरण प्रेमींचे ठाम मत आहे !
का होतोय विरोध ?
पैठण जलाशयावर आज न्हवे तर कित्येक पिढ्यांनपिढ्या पारंपारिक मासेमारी करणाऱ्या कुटुंबाची संख्या मोठी आहे, या जनसमुदायाच्या रोजच्या उदरनिर्वाहाचे एक मात्र स्त्रोत हे पैठण जलाशय असून या ठिकाणी तरंगते सौर पॅनल बसवल्यांनतर मासेमारीसाठी कसलाही पर्याय त्यांना उरणार नसून उघड्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर येईल अशी भावना या समाजात आहे.
सोबतच बरेचश्या पक्षी प्रेमी आणि निसर्गप्रेमींनी विविध विभागांना कायदेशीर निवेदन देत यात नैसर्गिक जैव विविधता धोक्यात येईल अशी चिंता व्यक्त केली आहे
मच्छीमारांचे पुढचे पाऊल काय?
पैठण तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढल्यानंतर शासनाने हवी तशी दखल याची घेतली नाही त्यामुळे
आत्ता आमरण उपोषणाचा मार्ग समाज बांधवांनी अवलंबला आहे येत्या सात तारखेपासून तहसील कार्यालय नेवासा आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पैठण येथे करण्यात येत असल्याचा इशारा सरकारला देण्यात आला.सोबतच राज्यभर पसरलेल्या कहार- भोई समजामार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले . हे सर्व मार्ग अवलंबल्या नंतरही शासनाने योग्य ती कार्यवाही करून प्रकल्प स्थगित केला नाही तर संविधानिक आणि न्यायालयीन कायदेशीर लढाई साठी देखील कहार-भोई समाज सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
सरकारची भूमिका काय?
अद्याप या विषयावर शासनाच्या वतीने कुठलेही अधिकृत भाष्य आलेले नाही मात्र या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला सर्व स्तरातून होणारा विरोध पाहता शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाच्या वतीने तातडीने प्रकल्प स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात यावे व सात तारखेच्या आत लेखी स्वरूपात संबंधित संस्था ट्रस्ट कमिटी पंच यांच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, असे न झाल्यास सात तारखेला दुपारी बारा वाजता सामूहिक अमरण उपोषण करणार आहेत यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास याला शासन प्रशासन सरकार जबाबदार राहील…
प्रा. डॉ.दिलीप बिरुटे
(प्राध्यापक तथा पक्षीप्रेमी)
पशु पक्षी, पर्यटन व मच्छिमार तसेच जैविक विविधतेवर मोठा परिणाम होणार असून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर निवेदन देण्यात आले आहे येत्या सात डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालय व पैठण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सामूहिक मच्छिमार समाज यांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे
– कुंदन डिंबर
(राज्य कोषाध्यक्ष कहार समाज संघटना)
केंद्र आणि राज्य शासनाने गरीब आणि निष्पाप मच्छीमार बांधवांच्या पोटावर दिलेले हे अमानुष पाय आहेत योग्य वेळेत प्रकल्प रद्द झाला तर ठीक अन्यथा शासनाला समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
राजेभाऊ रतन कुटारे
(परभणी जिल्हा अध्यक्ष,कहार समाज संघटना)