आता माघार नाही ; राजकीय नेत्यांना गावबंदी, निवडणुकांवर बहिष्कार
मराठा आरक्षण ; गेवराई तालुक्यातील सिंदखेड गावकऱ्यांचं ठरलं
गेवराई :
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाल्यानं राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध भागातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान गेवराई तालुक्यातील सिंदखेड येथील ग्रामस्थांच ठरल आहे.जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश करू दिला जाणार नाही. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
गेवराई तालुक्यातील सिंदखेड येथे एक दिवशीय उपोषणाचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध प्रकारे आंदोलन करुन मराठा आरक्षणाची मागणी पुढं केली जात आहे. तर सिंदखेड येथे राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तर, आगामी काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर करून ग्रामपंचायतने सर्वानुमते ठराव पास केला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात प्रवेश मिळणार नाही असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून नागरिक आपल्या मुद्द्यांवर ठाम असल्याचा निर्धार व्यक्त केला. येथून पुढे येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर नागरिक बहिष्कार घालणार असल्याचा ठराव सर्वानुमते हात उंचावून मंजूर करण्यात आला. यावेळी तहसिलदार यांच्या मार्फत शासन प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासन काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.