मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठींबा
शिवसेनेचा शेतकरी मोर्चा 6 ऐवजी 8 सप्टेंबरला — बदामराव पंडित
हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा — युधाजित पंडित
गेवराई ( प्रतिनिधी ) यावर्षी पाऊस न झाल्याने गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा. जनावरांसाठी छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या. यासह विविध मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काढण्यात येणारा विराट शेतकरी मोर्चा 6 सप्टेंबर ऐवजी आता दि 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याने मोर्च्याची तारीख पुढे वाढवली असल्याची माहिती शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिली आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी जि प सभापती युधाजीत पंडित यांनी केले आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघात पावसाळा संपत आला तरी पाऊस पडला नाही. यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पेरणीही होऊ शकली नाही. काही ठिकाणी पेरणी झाली मात्र पावसा अभावी पिके जळून गेली आहेत. अशा स्थितीत गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा. जनावरांसाठी चारा छावणी तर शेतकऱ्यांसह गायरान धारक शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत करा. शेतकऱ्यांचे विज बिल माफ करून बँकामार्फत होणारी कर्ज वसुली थांबवा आदींसह विविध मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6 सप्टेंबर रोजी गेवराई तहसीलवर विराट शेतकरी मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी पाठिंबा दिला असून, शेतकऱ्यांचा विराट मोर्चा आता 6 सप्टेंबर ऐवजी 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या शेतकरी मोर्चा कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आपल्या न्याय आणि हक्काच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी तसेच शेतकरी पुत्रांनी हजारोच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना बीड जिल्हा समन्वयक तथा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजीत पंडित यांनी केले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गेवराई मतदार संघातील प्रत्येक गावात शेतकरी आणि शिवसैनिक मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत.