जालना पोलिस अधिक्षक तुषार दोशींना बडतर्फ करा ; जरांगेंच्या समर्थनार्थ मांजरसुंब्यात उपोषण संपन्न.
आठ ग्रामपंचायतीने दिले जाहिर पाठिंब्याचे पत्र.
बीड | प्रतिनिधी.
जालना जिल्ह्यातील लाठीमार प्रकरणाचे बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पडसाद उमटल्याचे दिसत आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच शेकडो आंदोलकांवर दाखल केलेले ३०७ सारखे गंभीर गुन्हे मागे घेऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी करत दि. ५ सप्टेंबर रोजी बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
अंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणा दरम्यान पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला. त्यासंदर्भातील तात्काळ चौकशी करून पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि मा.श्री.मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मौजे मांजरसुंबा आणि परिसरातील मराठा समाजाच्या वतीने यमुना आक्का मठ, नेकनूर रोड, मांजरसुंबा ता.बीड येथे आज दि.०५ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दिवसभरात आठ ग्रामपंचायत कार्यालयांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंब्याचे पत्र दिले आहेत. तर पुढील सर्व आंदोलनांमध्ये ११ गावातील लोक पुर्ण ताकदीने सहभागी असतील असे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे बीड तालुक्यातील बालाघाटावरील आंदोलनाचे स्वरूप मोठे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान उपोषणकर्ते अशोक काळकुटे, अंगद मोहितेंसह आदींनी तहसीलदार सुरेंद्र डोके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या विनंतीवरून उपोषण मागे घेतले.
मराठा समन्वयक अंगद मोहिते आणि अशोक काळकुटे यांनी सर्व मागण्या तहसीलदारांसमोर मांडताना मनोज जरांगे यांच्या जिवाला काही झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील याची नोंद घेऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
यावेळी गंगाधर नाना काळकुटे, नारायण बप्पा शिंदे, भारत बप्पा काळे, डॉ.गणेश ढवळे, अरुण काका रसाळ, अनिल जाधव, जी.एस बाप्पु चौधरी, संदिप नवले, बळवंतराव कदम, सखाराम काळकुटे,पंडित आरबने ,संदीप कदम, अशोक रसाळ, नितीन कदम, दिनेश कदम पाटील, बाळासाहेब मोरे, संदिप इंगोले, अजिज शेख, शंकर आप्पा चव्हाण, अशोक काळकुटे, सूर्यकांत रसाळ, मुकुंद आगळे, चंद्रशेन अंकुशे, सर्व सरपंचांसह आदी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.