*स्वातंत्र्य हा केवळ शब्द नाही, स्वातंत्र्य ही केवळ भावना नाही तर स्वातंत्र्य हे एक मूल्य आहे.*
स्वातंत्र्य ही कुणीही कुणालाही देण्याची गोष्ट नाही तर प्रत्येकाला ते जन्मजात असतं हे मान्य करण्याची गोष्ट आहे.
स्वातंत्र्य ही जरी जन्मजात गोष्ट असली तरी ज्या समाजाला शेकडो, हजारो वर्षे गुलामीची पार्श्वभूमी आहे तेथे स्वातंत्र्याचं हे मूल्य जाणीवपूर्वक रुजवावं लागतं, बिंबवावं लागतं.
मला जसं स्वातंत्र्य आहे तसं ते इतरांनाही आहे हे मान्य करावं लागतं.
कुणाची जात, धर्म, भाषा, प्रांत किंवा लिंग यावरून एखाद्याचे स्वातंत्र्य हिरावलं जाऊ नये यासाठी दक्ष रहावं लागतं.
स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला जसं वाटेल तसं वागण्याची मुभा!
मात्र हे स्वातंत्र्य उपभोवताना इतरांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होणार नाही, कुणाचही स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही याचं भानही असावं लागतं.
आपल्या देशाच्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दिलं आहे.
एक नागरिक म्हणून संविधानाने मला दिलेलं स्वातंत्र्य उपभोगताना इतर कुणाचंही स्वातंत्र्य संकोचणार नाही याचं मी भान ठेवीन आणि इतर कुणाच्याही स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही अशा पद्धतीने जे वागतात त्यांचं तसं वागण्याचं स्वातंत्र्य मान्य करीन.
जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतीय, लैंगिक किंवा राजकीय बहुसंख्यांकत्वामुळे वरीलपैकी कोणत्याही अल्पसंख्यांक व्यक्तीचे किंवा समूहाचे स्वातंत्र्य संकोचले जाऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आणि संवेदनशील माणूस म्हणून मी प्रयत्न करीन.
वेळ आली तर माझ्या स्वतःच्या किंवा इतर कुणाच्याही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करायला मी तयार असेन. भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी स्वतःच्या मनाशी हा दृढ संकल्प करत आहे.
७७ वा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
इन्कलाब जिंदाबाद…
*क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठाण केज*
शेतकरी कामगार पक्ष केज, बीड