*बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या शृंखलेचा होणार विस्तार*
*खा. प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट*
*धारूर घाटातील रस्त्याचे रुंदीकरण आणि तेलगाव-सिरसाळा मार्ग चौपदरी करण्याची केली मागणी*
बीड । दि.०३ ।
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक असलेल्या विविध मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद आहे. खा.प्रितमताई मुंडे यांचा पाठपुरावा आणि गडकरी यांच्या प्रतिसादातून जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या शृंखलेचे विस्तारीकरण होणार आहे. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण, चौपदरीकरण आणि प्रलंबित कामे पूर्ण करणाच्या विविध मागण्या प्रितमताई मुंडे यांनी त्यांच्याकडे सादर केल्या.
लातूर जिल्ह्याच्या हद्दीपासून बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव दरम्यानचा महामार्ग चौपदरी करण्यात यावा, तसेच याकरिताचा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समाविष्ट करून चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात यावी व तेलगाव-सिरसाळा या वीस कि.मी रस्त्याचे पदपथासह चौपदरीकरण करण्यात यावे आणि वार्षिक योजनेत सदरील रस्त्याचा समावेश करून मंजुरी देण्यात यावी अशी मागणी खा. प्रितमताई मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
तसेच धारूर तालुक्यातील घाटात असलेल्या अरुंद रस्त्याविषयी खा. मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.धारूर घाटातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने इथे अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे. याठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब त्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. धारूरच्या घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी राज्य रस्ते महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्याच्या मागणीसह सदरील कामांना रस्ते विकास मंत्रालयाच्या वार्षिक योजनेत समाविष्ट करण्याची विनंती त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे, जिल्ह्यातील लोकहिताचे सर्व कामे मार्गी लावण्यासाठी नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.
••••