◼️सा.बीड सिटी लाईफ’चे संपादक व सहसंपादकावर खोटा आरोप करत तक्रार दाखल; पत्रकारांकडून निषेध व्यक्त
◼️माध्यमांचा आवाज दाबणे म्हणजे लोकशाहीच्या मूळ संकल्पनेलाच तडा!
गेवराई महाराष्ट्र आरंभ वृत्त : शासन व गोरगरीब सर्व सामान्य माणसाला आरसा दाखवण्याचे काम प्रसार माध्यम करतात. तसेच लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचा आवाज शासनदरबारी पोहचवण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते, आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्याने गेवराई तालुक्यातील चकलांबा महसूल मंडळात असणाऱ्या महारटाकळी सज्जाचे तलाठी शेख जावेद यांच्या विरोधात पुराव्यानिशी बातमी सा.बीड सिटी लाईफ या वृत्तपत्रांमध्ये दोन बातम्या प्रकाशित केली होती. त्या बातमी आधारे गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी चौकशी करून सदरील तलाठ्याची बदली केली असून, बदली केल्याचा राग मनात धरून तलाठी जावेद शेख यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात संपादक शेख आमीन व सहसंपादक सय्यद बादशहा यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे. चकलांबा पोलिसांनी पत्रकारांवर खोटी तक्रार दाखल करत लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती असे की, गेवराई तालुक्यातील चकलांबा महसूल मंडळात असणाऱ्या महारटाकळी येथील एका शेतकऱ्याची फेर ओढण्यासाठी तलाठ्यांनी शेतकऱ्याकडून तब्बल ६० हजार रूपयांची लुट केली असल्याची माहिती सदरील शेतकऱ्यांनी सा.बीड सिटी लाईफ च्या कार्यालयात येऊन दिली होती. त्या माहितीनुसार आणि पुराव्यानिशी बातमी दि.०३ डिसेंबर २०२४ व दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी दोन बातम्या संबंधित तलाठी शेख जावेद यांच्या विरोधात प्रकाशित केली होती आणि त्या बातमीची दखल घेत तहसीलदारांनी त्या तलाठ्याची बदली केली आहे. बदली केल्याचा राग मनात धरून संपादक व सहसंपादकावर खोटा आरोप करत चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रार दाखल करत सत्याच्या बाजूने चालणाऱ्या पत्रकारांची चकलांबा पोलिसांनी आणि संबंधित तलाठी शेख जावेद यांनी लेखणी बंद करून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला असून लोकशाहीतील एका मोठ्या वैचारिक लढ्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजामध्ये घडणाऱ्या बिघडणाऱ्या घटनांची अचूक माहिती घेऊन पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून घडत असलेल्या गैरप्रकार उघडकीस करत असतात आणि त्यांच्यावर जर असे खोटे तक्रारी नोंद करून दबाव आणण्याचा प्रयत्न चकलांबा पोलिसांकडून करण्यात येत असेल कुठेतरी लोकशाहीचा गळा दाबून बेकायदेशीर कामाला प्रोत्साहन देण्यात येत आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे गेवराई तालुक्यातीलसह जिल्ह्यातील पत्रकारांकडून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जात आहे.