◼️वरळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम
बीड, महाराष्ट्र आरंभ वृत्त : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमी, दादर येथे येऊन अभिवादन करतात. याच विशेष प्रसंगाचे औचित्य साधत वरळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जागर व मार्गदर्शनाचा उपक्रम राबवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमामध्ये बाबासाहेबांच्या शिक्षणविचारांना मूर्त रूप देण्यासाठी आणि वंचित विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
ग्रामीण आणि आदिवासी भागातून शिक्षणाचे स्वप्न घेऊन मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी वरळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध शैक्षणिक कोर्सेस, शिष्यवृत्ती, व्यावसायिक शिक्षण, आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती संकलित केली आहे. या माहितीच्या आधारे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा दाखवण्यात आली.
बाबासाहेबांनी दिलेला “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश अंगीकारून, विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम, आणि शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना नवी दृष्टी मिळाली आहे.
चैत्यभूमीवरील शैक्षणिक जागर केवळ मार्गदर्शन नव्हे, तर बाबासाहेबांच्या समतावादी विचारांचे सशक्त प्रतिबिंब आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला. विशेषतः अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम फारच महत्त्वाचा ठरला आहे.
बाबासाहेबांचे शिक्षणविचार आणि समतेचे स्वप्न साकार करण्यासाठी वरळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला आहे. हा उपक्रम केवळ शैक्षणिक मदतीपुरता मर्यादित नसून, समाजात शैक्षणिक जागर निर्माण करण्याचा आणि बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचा दृष्टीकोन असलेला प्रयत्न आहे. “चैत्यभूमीवरील हा शैक्षणिक उत्सव म्हणजे बाबासाहेबांच्या शिक्षणक्रांतीला दिलेले खरे अभिवादन आहे.”