गेवराई प्रतिनिधी,(महाराष्ट्र आरंभ):- आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकाने तब्बल एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करत पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे स्वतःहून एसीबी समोर हजर झाले. यानंतर पोलिसांनी खाडे यास अटक केली आहे.
बीड शहरातील माँ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील ५ लाख रुपये मध्यस्थी कुशल जैन याच्या मार्फत स्वीकारले होते. या दरम्यान एसीबीने कारवाई केली होती. या प्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर हरिभाऊ खाडे फरार होता. त्याच्या घराची झडती घेतली असता १ कोटी रुपये रोख, साडेपाच किलो चांदी, ९० तोळे सोने, बारामती, इंदापूर, परळी, बीड येथील व्यापारी गाळे आणि फ्लॅट, सहन प्लॉटचे कागदपत्रे जप्त करण्यात आले होते. दरम्यान एसीबीकडून केलेल्या कारवाईनंतर खाडे फरार झाला होता. यांच्या शोधासाठी चार पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. मात्र रात्री उशिरा खाडे हा स्वतःहून एसीबी समोर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.