गेवराई, प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- तालुक्यातील तळणेवाडी परिसरात गुरुवारी पैठणचा उजवा कालवा भागदाड पडुन फुटला आहे. त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पैठणच्या उजव्या कालव्यातून रोटेशन प्रमाणे पाणी सोडण्यात आलेले होते या पाण्यामुळे कालव्या खालील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान तर जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीशा प्रमाणात मिटला होता. मात्र जलसंपदा विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता व आहे ते कर्मचारी अधिकारी लक्ष देत नसल्याने अनेकदा कालवा व वितरिका फुटण्याचा प्रकार घडत आहे. याआधी उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक 26 आणि वितरिका क्रमांक 29 ह्या ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचे नुकसान होत हजारो लिटर पाणी वाया गेले होते या घटनेला चार-पाच दिवस लोटताच आज पुन्हा तळणेवाडी परिसरात कालवाच फुटला. यामधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे दरम्यान कालवा फुटल्यामुळे गुळज येथील सिआर बंद करून खाली येणारे पाणी बंद करण्यात आले असल्याची माहिती आहे. मात्र घटना घडल्यानंतर उशीरा अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.