बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना..!
बीड दि.१५ प्रतिनिधी (महाराष्ट्र आरंभ):- जिल्ह्यात पुन्हा धक्कादायक घटना समोर आली आहे. बोलावून घेऊन युवकाचा तिक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीडच्या अंबाजोगाई शहरापासून काही अंतरावर असलेल्या अंबासाखर कारखाना उड्डाण पुलाच्या खाली 14 एप्रिल 2024 रोजी रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान घटना घडली असून, संजय आत्माराम राठोड (वय 35, रा. पोरेगाव तांडा, जिल्हा लातूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
संजय राठोड हा ऊसतोड कामगार होता, तो सध्या अंबासाखर कारखाना येथे वास्तव्यास होता. राडी तांडा येथील तो जावई होता. त्याचे किराणा दुकान, चिकनचे दुकान आणि तो मत्स्य व्यवसाय देखील करत होता. काल दिनांक14 एप्रिल रोजी संजय राठोड हा राडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी गेला होता. तिकडून येऊन त्याने आंघोळ केली आणि आराम करत होता. तेवढ्यात त्याला एक फोन आला आणि तो गाडीवर बसून गेला. तो घरी परत आला नाही.अंबासाखर कारखाना उड्डाण पुलाच्या खाली संजय राठोडचा धारदार तिक्ष्ण हत्याराने छातीत, पोटात वार करून खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामा पडवळ यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देऊन घटनास्थळी पाठवले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान घटनेनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जमा होऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत गोंधळ घातला. त्यांनतर एकाला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी फरार आहे. पोलीसांच्या अधिक तापसानंतर कोणत्या कारणासाठी खून करण्यात आलाय याची माहिती मिळणार आहे.