28.9 C
New York
Friday, June 14, 2024

Buy now

तुमचं प्रत्येक मत माझ्यावर कर्ज; जिल्हा विकसित करूनच परतफेड करू – पंकजाताई मुंडे

पाटोद्याच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कसली पंकजाताईंच्या विजयासाठी कंबर

पंकजाताईंच्या दारात कुठलाही रंग पाहिला जात नाही ; इथं प्रत्येकाचं काम सन्मानपूर्वक केलं जातं

बीड दि.१२ (प्रतिनिधी):- पंकजाताईंच्या दारात कुठलाही रंग पाहिला जात नाही. प्रत्येकाचं काम इथं सन्मानपूर्वक केलं जातं. समाजातील सर्व घटकांचे हित साधत वंचित, उपेक्षितांचे स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही राजकारणात आहोत. लोकनेते मुंडे साहेबांची लेक म्हणून माझ्यावर जरूर प्रेम करा, पण मला मतदान करतांना माझ्यातील नेतृत्व, कर्तृत्वाला मतदान करा. तुमचं प्रत्येक मत हे माझ्यावर कर्ज आहे, त्याची परतफेड जिल्हयात विकासाची कामे करूनच करेन त्यासाठी मला साथ द्या असं आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केलं. गेल्या निवडणुकीत पाच लाख मतं घेणाऱ्यांनी पाच वर्षांत जनतेचा चेहरा तरी पाहिला आहे का? असा सवालही त्यांनी केला.

भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरात आज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे, रामकृष्ण बांगर, दशरथ वनवे, शिवाजी राऊत, विश्वास नागरगोजे, आप्पासाहेब राख, राहूल चौरे, आप्पासाहेब जाधव, देविदास शेंडगे उपस्थित होते.

इथली जनता फार दुरदर्शी आहे. जिल्ह्यात बसून त्यांना मुंबई, दिल्ली दिसत असते. इथल्या जनतेने कायम आपल्या नेतृत्वाला जपलेले आहे. मुंडे साहेब निवडणूकीत पडणार अशी चर्चा केली जायची मात्र जनतेने मुंडे साहेबांना निवडून दिले. त्यानंतर डॉ.प्रितमताई मुंडेंनाही मोठ्या मताधिक्याने निवडून देत दिल्लीत पाठवले. आता मी प्रितमताईंची मोठी बहिण आहे, त्यामुळे तुम्ही प्रितमताईंपेक्षा अधिकचे मताधिक्य देवून मला दिल्लीत पाठवा. बीड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढत सर्वांना अभिमान वाटेल असे काम मी करून दाखवेल असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, माझे बंधु तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिशय अभ्यासूपणे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे आता मी उमेदवार म्हणून माझी उमेदवारी कशासाठी आहे, कशी आहे याविषयी मी संवाद साधेल खासदार म्हणून मी काय करु शकते हे लक्षात घेण्यासाठी तुम्ही २०१४ ते २०१९ या कालावधीत मी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून केलेले काम समोर ठेवा.जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या. महायुतीची उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांसमोर आले आहे. आपण सर्वांनी माझ्या निवडणूकीमध्ये मला सहकार्य करत भरघोस मतदान करुन प्रचंड मताधिक्क्याने मला निवडून देत संंसदेत पाठवा.

मी केलेली कामे मतदारांना सांगा

आता नव्या राजकीय वातावरणात आपण लोकसभा निवडणूकीला सामोरे जात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी आपली युती झाली आहे. त्यामुळे आता आपली ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आता या लोकसभा निवडणूकीत सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे. गावातील सेवा सोसासटीचे चेअरमन, सरपंच,, पंचायत समिती सदस्य, भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मला अधिकाधिक मतदान देण्यासाठी मेहनत घ्यावी. पाटोदा तालुक्याच्या विकासासाठी मी पालकमंत्री असताना मोठा निधी दिला. माझा प्रचार करायला जाताना पंकजाताईने पालकमंत्री असताना राबवलेल्या विकासाच्या योजना लोकांना सांगा असे आवाहनही पंकजाताईंनी केले.

तुमच्या उमेदवारावर काही आक्षेप आहेत का? उमेदवाराने कधी कुणाला त्रास दिलाय का? जातीयवाद केलाय का? कुणावर काही दडपशाही केली आहे का? असे सवाल उपस्थितांना करत पंकजाताई म्हणाल्या,सध्याचे वातावरण चांगले नाही. लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम सुरु आहे. मात्र ही दरी दूर करण्याचे काम मी करणार आहे. विकास हेच भाजप-महायुतीचे ध्येय आहे. मी फार मोठ्या गोष्टी बोलणार नाही मात्र जिल्ह्यातील प्रत्येकाला अभिमान वाटेल असे विकासात्मक काम जिल्ह्यासाठी माझ्या खासदारकीच्या माध्यमातून करेल. पालकमंत्री धनुभाऊ म्हणतात, पंकजाताई केंद्रात मंत्री होणार पण मी तसे म्हणणार नाही, मात्र मी दिल्लीत गेले तर लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मी सातत्याने जिल्ह्याच्या विकासासाठी बोलू शकेल. वर्षातून पाच वेळेस अधिवेशन असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नक्कीच बीड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मदत करतील. बीड जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या आर्थिक मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी नक्कीच पुढाकार घेतील. त्यामुळे मला दिल्लीत पाठवण्यासाठी तुम्ही अधिकाधिक मतदान द्या. विकासाची पेरणी करण्यापूर्वी विचारांची मशागत करणे आवश्यक असते. आपल्या बीड जिल्ह्याला वरमाला घालण्याचे काम नॅशनल हायवेने केले आहे. कोट्यावधी रुपयाचे रस्ते जिल्ह्यात झाले आहेत. हायवेच्या बाजूचा परिसर विकसित झाला आहे. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले आहे. जमिनीचे भाव प्रचंड वाढले. हा बदल लोकांना दिसतो आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवल्या जात आहेत. जनता हे सर्व पाहत आहे. त्यामुळे विकासाचे राजकारण करणार्‍यांना जनता नक्कीच साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रेल्वे परळीपर्यंत धावणार

दहा वर्ष प्रितमताई मुंडे बीड जिल्ह्याच्या खासदार राहिल्या. ज्या गोष्टी कधीच कोणी केल्या नव्हत्या, त्या खा.प्रितमताई मुंडेंच्या कार्यकाळात पुर्णत्वास गेल्या. नगर-बीड-परळी रेल्वे नगर ते अंमळनेर पर्यंत रेल्वे धावली आहे. ७५ वर्ष रेल्वेचे स्वप्न पाहिले. आता ती प्रत्यक्षात धावत आहे, थोडे दोन चार वर्ष इकडे तिकडे झाले की, काहीजण रेल्वे कुठे आली बीडला असे म्हणत आहेत, असे सांगत पंकजा मुंडे म्हणाल्या, अमळनेर ते बीड आणि बीड ते परळी रेल्वे ही माझ्या खासदारकीच्या काळात नक्कीच धावेल हा शब्द मी आज तुम्हाला देते. मुंडे साहेबांच्या कार्यकाळात रेल्वेला सर्वाधिक निधी पहिल्यांदा मिळाला असेही त्या म्हणाल्या.

विरोधक कधी तुमच्याकडे आले का?

पाच लाख मते ज्या उमेदवाराने गेल्या निवडणूकीत बीड लोकसभेत मिळवली. त्या उमेदवाराने बीड जिल्ह्यातील जनतेचा चेहरातरी नंतर पाच वर्षात पाहिला का? असा सवाल करत पंकजाताई म्हणाल्या, असे विरोधक आहेत हेच बीड जिल्ह्याचे खरे तर दुर्देव आहे.

विकासकामे करुन तुमच्या मताची परतफेड करणार

तुम्ही मला डोळे झाकून मत द्या, जनतेचे एक मत म्हणजे मी कर्ज समजते. त्या कर्जाची परतफेड मी विकासकामे करुन फेडत असते. माझ्याकडे कोणतीही जात-पात-धर्म असा भेदभाव नसतो. मी कधीही राजकारणाचा गैरवापर केला नाही, मी कधीही वाईट वागलेले नाही. मी कोणाचाही राग मानलेला नाही. केवळ विकासासाठी समाजकारण हेच माझे ध्येय असल्याचेही पंकजाताईंनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या