गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील दुर्दैवी घटना
गेवराई दि.१२ (प्रतिनिधी):- शेतात काम करत असताना अचानक वीज अंगावर पडल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवार (दि. १२) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे घडली आहे. मीना गणेश शिंदे (वय ३५) असे मृत्यू महिलेचे नाव आहे. तर ओंकार गणेश शिंदे (वय १५) असे जखमी युवकाचे नाव आहे.
गेवराई शहरात तसेच परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, गेवराई शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मन्यारवाडी येथील मीना शिंदे व ओंकार हे माय-लेकरं शेतात काम करत होते. याचवेळी अचानक पाऊस व विजेचा कडकडाट सुरु झाल्याने मिना शिंदे व ओंकार हे दोघे लिंबाच्या झाडाखाली थांबले. यावेळी वीज कोसळल्याने मीना यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार गंभीररित्या जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ओंकार याला गेवराई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. मृत महिलेच्या पश्चात पती, मुलगी व जखमी मुलगा ओंकार असा परिवार आहे.