उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत 70 हजार रुपयांचा दंड केला वसूल
गेवराई दि.११ (प्रतिनिधी):- चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पेट्रोलिंग करत असताना महार टाकळी ते उमापूर रस्त्यावर एक मॉडीफाय डीजे वाहन mh 20 A 2979 मिळून आल्याने त्याचे ड्रायव्हर यास गाडीचे मूळ कागदपत्रे लायसन व मॉडीफाय परवाना बाबत विचारणा केली असता त्यांनी उडाउडीचे उत्तरे दिली. म्हणून पोलिसांनी सदरचा डीजे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे डिटेन केला. त्याबाबत माननीय उप प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून तपासणी केली असता त्यांनी त्यास 70 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना सदर बाबत अधिक माहिती विचारली असता त्यांनी सदरचे वाहन हे मॉडीफाय केलेले असल्याने त्याचे मूळ कागदपत्रे नसल्याने कारवाई झाले बाबत सांगितले. डीजे चा कमीत कमी आवाजही माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबल तीव्रते पेक्षाही जास्त असतो त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली होण्याची शक्यता असते तसेच डीजेच्या आवाजाच्या तीव्रतेमुळे व व्हायब्रेशन मुळे वयोवृद्ध माणसे व लहान मुले यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस स्टेशन हद्दीतील लोकांना डीजे न वाजण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही डीजे मिळून आल्यास त्यास जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत