मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग बाभळीच्या विळख्यातून मुक्त होणार
बीड दि.१० (प्रतिनिधी):- अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान साईडपंख्यावरील बाभळीच्या झाडांचा विळखा पडल्याने पादचारी तसेच दुचाकी वाहनचालकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते.याप्रकरणी संबंधित एचसीपीएल कंत्राटदार यांना वारंवार कळवुनही कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर १० दिवसांपूर्वी लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी गांधीगिरी आंदोलन करत ग्रामस्थांनीच बाभळीच्या झाडाझुडुंपाची छाटणी केली होती.याविषयी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.त्यानंतर एचसीपीएल कंपनीला जाग आली असुन जेसीबीच्या साह्याने बाभळीची झाडेझुडपे मुळापासून उपटून साईडपंख्याच्या बाजूला करण्यात येत आहेत.
प्रसारमाध्यमांच्या दणक्याने एचसीपीएल कंपनीला आली जाग ; जेसीबीच्या सहाय्याने बाभळीच्या झाडाझुडपांची सफाई सुरू:- डॉ.गणेश ढवळे
महामार्गावरील बाभळीच्या झाडाझुडपांमुळे दुचाकी वाहनचालकांना अडचण येत होती.याविषयी जिल्हा प्रशासन तसेच एचसीपीएल कंपनीला लेखी निवेदनाद्वारे विनंती करून सुद्धा सुधारणा न झाल्याने १० दिवसांपूर्वी गावातील डॉ.गणेश ढवळे, हरिओम क्षीरसागर, विक्रांत वाणी, संतोष वाणी, कृष्णा वायभट,दादा गायकवाड, संतोष भोसले आदिंनी स्वतः कु-हाडीच्या सहाय्याने बाभळीच्या झाडाझुडपांची साफसफाई केली होती.याची विविध दैनिकात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली होती.अखेर प्रसारमाध्यमांच्या दणक्याने एचसीपीएल कंपनीला जाग आली असुन त्यांनी पाटोदा ते मांजरसुंभा महामार्गावरील बाभळीच्या झाडाझुडपांची जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई सुरू केली आहे.