चालकाचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी
केज दि,०९ प्रतिनिधी:- तालुक्यातील कोरेगाव शिवारातून जाणाऱ्या महामार्गावरील पुलाच्या वळणावर आज पहाटे साडेपाच वाजता कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. गणेश त्रिंबक गावंडे (48, हरीकिशन सोसायटी ,मलकापूर जि बुलढाणा) असे मृताचे नाव आहे.
नांदुरा ( जि बुलढाणा) येथील सुखदेव बंडुजी ढोकरे हे गणेश त्रिंबक गावंडे याच्या भाड्याच्या कारने ( क्रमांक एम एच 28 / ए झेड 1164) लातूरला जात होते. तर लातूर येथून टोमॅटोचा माल घेऊन एक ट्रक ( क्रमांक एम एच 09/ सीयु 8182 ) सुप्याकडे जात होता. दरम्यान, आज पहाटे साडेपाच वाजता तालुक्यातील कोरेगाव पुलावरील वळणावर भरधाव वेगातील कारचा ताबा चालकाकडून सुटला. कारने समोरून येणाऱ्या ट्रकला समोरून जोरदार धडकली दिली. यात कार चालक गणेश त्रिंबक गावंडे (48, हरीकिशन सोसायटी ,मलकापूर जि बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला. तर सुखदेव बंडुजी ढोकरे हे गंभीर जखमी आहेत. परिसरातील नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अपघातानंतर ट्रकचालक अपघातस्थळावरून पसार झाला. जमादार दत्तात्रय बिक्कड यांनी पंचनामा केला. नगर येथील शिवशंभो ट्रान्सपोर्ट ही मालट्रक असून संतोष बाळासाहेब मगर यांच्या मालकीची आहे.