*ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी बीड शहरात उभारले जाणार वसतिगृह*
*अंदाजपत्रक सादर करा ; सामाजिक न्याय विभागाचे बांधकाम विभागाला पत्र*
*खा. प्रितमताई मुंडे यांचे आभार, त्यांच्या प्रयत्नांचे हे यश : संग्राम बांगर*
बीड । दि. ०६ ।
संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृह योजनेअंतर्गत बीड शहरात ऊसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह उभारण्यात येणार आहे. शहरातील सर्व्हे नंबर ३४ मधील ०.१५ हेक्टर आर जागा याकरिता प्राप्त झाली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला जागेची पाहणी करून अंदाजपत्रक सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांचा हे यश असल्याचे भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर यांनी म्हंटले आहे.
ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये याकरिता शासनाकडून मजुरांच्या पाल्यांच्या वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, सदरील वस्तीगृह उभारण्यासाठी बीड शहरातील तरफ माळी स. न.३४ मधील शासकीय जागा वस्तीगृह इमारतीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी खा. प्रितमताई मुंडे यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वस्तीगृह उभारण्याकरीता जागा मिळाली असून लवकरच या जागेवर प्रशस्त इमारत उभारण्यात येणार आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र उसाच्या फडात राबणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी तळमळीने प्रयत्न करणाऱ्या खा. प्रितमताई मुंडे यांचे समस्त ऊसतोड मजुर बांधवांच्या वतीने आभार , त्यांच्या प्रयत्नांनी ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार नसल्याचे संग्राम बांगर यांनी म्हंटले आहे.
••••