गेवराईत “कृषी पायाभूत सुविधा निधी” विषयी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – ताकृआ अभय वडकुते
गेवराई :
गेवराई तालुका कृषी कार्यालय येथील सभागृहात गुरुवार दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. “कृषी पायाभूत सुविधा निधी” Agriculture Infrastructure Fund व PMFME योजने अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते , महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कृषी अधिकारी प्रितम पलंगे, प्रगतशील शेतकरी दिपक दराडे, मंडळ कृषी अधिकारी केसभट, एस.व्ही वाघमोडे, कृषि पर्यवेक्षक आर.आर. चव्हाण, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विनोद पौळ, युवा शेतकरी रवि दाभाडे यांच्या सह आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी हि शेतकरी गट तसेच महिला बचत गटांसाठी चांगली योजना असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यासाठी कृषी विभागाचे सहकार्य मिळेल. तसेच योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कृषी अधिकारी पी.एस पलंगे यांनी बॅंकेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय कसा उभा करावा त्यासाठी असणारे नियम व अटी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तर पी. एम किसान सन्मान योजनेच्या ईकेवायसी संदर्भात मंडळ कृषी अधिकारी केसभट म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याने ईकेवायसी करुन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पी.एम किसान योजनेच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी योजने विषयी मार्गदर्शन करताना कृषी पर्यवेक्षक चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यानी कृषी विषयी निगडित असलेले मोसंबी प्रक्रिया, फळ प्रक्रिया ,दूध प्रक्रिया ,डाळ मिल ,तेल घाना इत्यादी छोटे मोठे उद्योग सुरु करुन बँकेत तसेच बाजार पेठेत पत कशी निर्माण करता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, आत्मा कर्मचारी, शेतकरी गटातील शेतकरी , महिला शेतकरी तसेच शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक लहु चव्हाण यांनी व्यक्त केले.
@ चौकट-
*कृषी आणि शेतकरी हा देशाचा सक्षम भाग आहे*
शेतकरी तसेच महिला बचत गटांनी आपल्या शेतात पिकणाऱ्या कुठलाही पिकांपासून उद्योग, व्यवसाय सुरु करावा. कोरोना काळात जग थांबले होते तरी जगाचा पोशिंदा हा थांबला नव्हता म्हणून कृषी आणि शेतकरी हा देशाचा सक्षम भाग आहे. त्याला नाजुक भाग बनवू नका. कृषी विभागामार्फत तसेच इतर शेतकरी उद्योग उभारणी साठी ध्येय ठरवले पाहिजे आणि ठरवलेले ध्येय पुर्ण करण्यासाठी मेहनती बरोबर आर्थिक भागभांडवल गरजेचे असते आणि म्हणून बॅंक लोनसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर बॅंकेचे कर्मचारी जेव्हा घरी येतात तेव्हा तुम्ही तत्पर राहून त्यांना आपल्या प्रोजेक्ट विषयी माहिती द्या. वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांची माहिती घ्या. विविध कृषी विषयक मेळाव्यास हजर रहा. त्याची माहिती घ्या.विविध उद्योगांची पाहणी करा तिथे भेटी द्या आणि आपल्या शेतात पिकणाऱ्या मालाला बाजारपेठ चांगली कशी मिळेल याकडे लक्ष द्या. तसेच कृषी विभागाच्या योजनेचा फक्त अनुदान लाटण्यासाठी फायदा घेवू नका ती योजना प्रत्यक्षात राबवा आणि सक्षम बना
– प्रितम पलंगे (कृषी अधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा कोळगाव)