घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार – डॉ.योगेश क्षीरसागर
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेतली महत्त्वपूर्ण बैठक
बीड दि.२५ (प्रतिनिधी) शहरातील गोर गरीब, वंचित लोकांसाठी बीड नगर पालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत हजारो घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. याच संदर्भात घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी महत्वपूर्ण बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा करत बीड नगर पालिकेच्या माध्यमातून गोर गरीब लोकांसाठी ३००७ घरकुल मंजूर करून आणली आहेत. ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली होती त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे या लाभार्थ्यांनी आणि नगरसेवकांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी देखील काही दिवसांपूर्वी यासंदर्भात प्रशासन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला घरकुल मंजुर झालेले नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबैठकीत डॉ.योगेश यांनी लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
- यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, स्व.काकू पासून आदरणीय आण्णासाहेब, अध्यक्ष साहेब यांनी आज पर्यंत गोर गरीब, वंचित लोकांसाठी काम केले आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे देखील काम करत आहोत. वंचितांना नेहमीच मदत करण्याचं काम केलं आहे. माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, मा.नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ही घरकुल मंजूर करून आणली आहेत. इतर नगर पालिकेच्या तुलनेत बीड नगर पालिकेच्या वतीने सर्वात जास्त घरकुल देण्यात आली आहेत. पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या १५ दिवसांत सर्वांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील. गरिबांना घरे देऊन सर्वांना समान न्याय देण्याचं काम शासन करत आहे. शासनाकडून मिळालेल्या पैशातून घरकुल लाभार्थ्यांनी घर बांधावे जर असे केले नाही तर शासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल. शहरातील एक ही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील आहोत. घरकुल मंजुरीसाठी कोणालाही एक रुपया देण्याची आवश्यकता नाही. आणि जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर त्याची आमच्याकडे तक्रार करा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. घरकुलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल घरकुल लाभार्थ्यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांचे आभार मानले.यावेळी नगरसेवक सय्यद इलियास, मुन्ना इनामदार,माजी नगरसेवक अमोल पौळ, मुजीब ए.वन., भागवत बादाडे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.