जिल्ह्यातील ९८ टक्के ग्रामसेवकांचा शहरात मुक्काम…
भाड्याच्या रूमधून चालतो कारभार…
गावच्या विकासाला खिळ नागरिकांच्या तक्रारी वाढल्या
माजलगाव प्रतिनिधी,
ग्रामसेवक हा प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्यातील विकासात्मक दुवा समजला जातो. शासकिय नियमानुसार ग्रामसेवकाने गावातच मुक्कामी राहणे गरजेचे असते. मात्र जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणी राहून कारभार हाकत असल्याने गावच्या विकास कामांना खिळ बसत असल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे जिल्ह्यातील बरिष्ठ अधिकाऱ्यांचे सर्रासपणे दुर्लक्ष असल्याचे दिसते. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविल्या जातात. या योजना गावपातळीवर राबविण्यासाठी जिल्हा
परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या माध्यमातून राबविण्याचे काम केले जाते. मात्र जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामसेवक तालुक्याच्या अन जिल्ह्याच्या ठिकाणी मुक्कामी असल्याने शासनाच्या योजना राबविणार कधी असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक योजना फक्त कागदावर राबविण्याचे काम ग्रामसेवकांकडून केले जात असल्याचेही दिसते. शासनाच्या नियमानुसार ग्रावसेवकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे धोरणात्मक निर्णय सुद्धा ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे. मात्र ग्रामसेवकाकडून शासन नियमांची पायमल्ली करत चक्क तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी मुक्काम ठोकतांना दिसतात. असे असतांनाही तालुका व जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. बहुतांश
ग्रामसेवक हे जिल्ह्याच्या ठिकाणावरून आठवड्यातून दोन ते तीन वेळेसच येत अप डाऊन करत तालुक्याच्या केलेल्या कार्यालयाला हजेरी लावतात. यासाठी गावातील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करत तालुक्याच्या कार्यालयाला ग्रामसेवक कधी येतो याची वाट बघत बसावी लागत असल्याचेही अनेक तक्रारी नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. अपवाद काही गावं सोडले तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सर्वच सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या गावातीलही ग्रामसेवकांचा तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी मुक्काम करायची काय गरज मात्र यांना कुणीच काही म्हणत नसल्याने आपल्या सोयीनुसार कारभार हाकत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाकडून गावातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच शासकीय विविध योजनांचे मार्गदर्शन गावापातळीवरील नागरिकांना समजून सांगण्यासाठी गावामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून ग्रामपंचायत कार्यालय उभा करण्यात आलेले असतांनाही जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामसेवकांकडून कुलूप ठोकत तालुक्याच्या ठिकाणी किरायाणे रूम करून त्या ठिकाणाहून गावचा कारभार चालवत आहेत. मात्र याकडे कुठल्याच अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
किमान रोज गावात हजेरी तरी लावा…….
अपवाद काही गाव सोडले तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सर्वच सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या गावातीलही ग्रामसेवकांचा तालुका व जिल्हयाच्या ठिकाणी मुक्काम करायची काय गरज परंतू त्यांच्या काही अडचणीमुळे राहत असतील तेही ग्रामस्थांकडून समजून घेतले जाते मात्र किमान गावातील कार्यालयाला रोज तोंड तरी दाखवायला यायचे तसे न करता चा तालुक्यालाच किरायाची रूम करत तालुक्यातून कारभार चालवतांना दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांकडून तुम्ही कुठे राहायचे ते रहा किमान रोज गावातील कार्यालयाला हजेरी तरी लावा अशी मागणी केली जात आहे.