निकाल अनाकलनीय, महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल वाटल नव्हतं : उध्दव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. निकालानंतर भाजप आणि महायुतीला जनतेने कौल दिल्याचं चित्र आहे. मात्र हा निकाल पूर्णपणे अनपेक्षित, अनाकलनीय निकाल असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘हा निकाल पूर्णपणे अनपेक्षित, अनाकलनीय असा निकाल आहे. पटला नाही तरी निकाल लागला आहे. कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. तरी जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीला मतं दिली त्यांचे आभार मानतो. लाटेपेक्षा त्सुनामी आली असं वातावरण या निकालाने दिसतंय. पण हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटला की नाही हा प्रश्न आहे. एकूण जे आकडे दिसतात ते आकडे पाहिल्यानंतर असं दिसतं की, या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे हे आकडे आहेत. थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही, एक-दीड वर्षापूर्वी भाजपचे तुर्तास असलेले अध्यक्ष जेपी नड्डा जे बोलले होते, की एकच पक्ष राहिल, वन नेशन वन पार्टी… अशी आगेकूच चालली आहे का असं हे चित्र आहे.’ हा निकाल बारकाईने पाहिला, तर आम्ही राज्यभरात प्रचार सभा घेतल्या, संपूर्ण राज्यभरात आम्ही सर्व फिरलो, हा निकाल लोकांनी महायुतीला मतं का दिली हा प्रश्न आहे. सोयाबिनला भाव मिळत नाही म्हणून दिली, की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले म्हणून दिली का? नेमकं कळत नाही कोणत्या प्रेमापोटी… प्रेमापोटी हा शब्द चुकीचा आहे, रागापोटी ही लाट उसळली आहे. हा निकाल अनाकलनीय आहे. यामागचं गुपित काही दिवसांत शोधावं लागेल