बीड, महाराष्ट्र आरंभ वृत्त : लोकशाहीत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा हक्क आणि कर्तव्य आहे. मिळालेल्या या अधिकाराचा उपयोग प्राधान्याने करून आपला लोकशाहीसाठीचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन हयात ग्रुप बीडचे अध्यक्ष मुफ्ती अब्दुल वाजिद अशरफी यांनी केले.
ते म्हणाले की, भारताने लोकशाही स्वीकारून देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. या हक्काचा योग्य उपयोग करत योग्य प्रतिनिधी निवडणे हे आपले कर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे मत पेटीतून प्रतिनिधी निवडून येतो. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याला किंवा प्रलोभनाला बळी न पडता, जाती-पातीच्या भेदभावाला थारा न देता प्रत्येकाने मतदान करावे.“देशातील विकास, शांती, एकता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे,” असे त्यांनी सांगितले.