बीड बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; निर्भीड पत्रकार संघाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.
बीड प्रतिनिधी
पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर महिलेवर झालेल्या अमानुष प्रकारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही घटना डोळ्यांसमोर ठेवून बीड जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार संघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बीड बसस्थानकाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे निर्भिड पत्रकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण डोळस यांनी केली आहे.
बीड बसस्थानकाचे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी पूर्वी असलेली पोलीस चौकी आता दिसेनाशी झाली आहे. सध्या केवळ दोन पोलीस कर्मचारीच सुरक्षेसाठी आहेत, तर रात्रीच्या वेळी खाजगी सुरक्षा रक्षकही उपलब्ध नसतात.काम सुरू असल्याने बसस्थानकावर सर्वत्र अंधार आहे. शिवाय, मुख्य प्रवेशद्वारालाही गेट नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी नशेखोर व गुंड प्रवृत्तीचे लोक बसस्थानकात मुक्त वावरताना दिसतात. परिणामी महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पुणे येथील दुर्दैवी घटना बीडमध्ये घडू नये यासाठी तातडीने कडक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निर्भीड पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण डोळस व जिल्हा सचिव आम्रपाली साबळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष मोनिका बेदरेयांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे तसेच पोलीस अधीक्षकांनी तत्काळ लक्ष घालावे आणि बीड बसस्थानकाला सुरक्षित बनवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.