◼️आचारसंहिता देखील लागू होणार; दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
बीड, महाराष्ट्र आरंभ वृत्त : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.
आमदारांच्या शपथविधीनंतर दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला होता. तेव्हाच विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, याचे संकेत मिळाले होते. सोमवारी दुपारीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत टोलमाफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले होते. याशिवाय, आज दुपारी 12 वाजता राज्यपालनियुक्त 7 आमदारांचा विधानभवनात शपथविधी पार पडेल. यानंतर लगेच दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.
संपूर्ण देशाचे निवडणुकीकडे लक्ष?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. यामुळं राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. 2019 साली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडली होती. यावेळी किती टप्प्यात राज्याची निवडणूक होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरणा आहे.
निवडणुकीच्या घोषणेआधी सरकारकडून मोठे निर्णय
कोणत्याही क्षणी राज्यात आचारसंहिता लागू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. महायुती सरकारने या निर्णयांतर्गत होमगार्ड्सचे वेतन जवळपास दुप्पट केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या पाच टोलनाक्यांवरील टोल माफ करण्यात आला आहे. या निर्णयांचा महायुतीला फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.