🔸बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पंधरा दिवस उलटूनही अद्याप कारवाई नाही
महाराष्ट्र आरंभ, गेवराई : तालुक्यातील वाहेगांव आम्ला येथील एका शेतकऱ्याच्या सामुदायिक बांधावरील मोठमोठे कडुलिंबाचे झाडे तेथील पाच जणांनी बेकायदेशीर तोडून त्याची विक्री एका व्यापाऱ्याला केली आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी तलवाडा पोलिसात व वनविभागाकडे तसेच तहसील प्रशासनाकडे पाच जणांविरोधात तक्रार केली आहे. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यावर प्रशासनाचा कोणताच अंकुश नाही. वनविभागासह तहसील प्रशासन सुस्त असून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. याप्रकरणी तक्रार देऊन पंधरा दिवस उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आर्थिक हितसंबंध जपले जातात की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील वाहेगांव आम्ला येथील भागवत खेत्रे हे सध्या खाजगी कामानिमित्त बीड येथे राहतात. आणि यांची शेती वाहेगांव आम्ला येथे गट नंबर २६७ मध्ये असून, त्यांच्या सामुदायिक बांधावर मोठमोठे कडुलिंबाचे सहा झाडे आहेत. परंतु त्यातील दोन लिंबाचे झाडे परस्पर तोडून ते एका व्यापाऱ्याला विकले होते. याची माहिती मिळताच भागवत खेत्रे त्या ठिकाणी येऊन, झाडे का तोडले असे विचारपूस केली असता, त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत हुज्जत घालू लागले असल्याचे भागवत खेत्रे यांनी बोलताना सांगितले. तसेच याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वनविभागासह तहसील प्रशासनाकडे देखील तक्रार केली आहे. परंतु याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने अवैध वृक्षतोड होत आहे. तक्रार करूनही याकडे तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष का? पंधरा दिवस उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. ताबडतोब याप्रकरणी चौकशी करून कायदेशीर हे वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करून आळा घालावा अशी मागणी भागवत खेत्रे यांनी केली आहे.