🔸बीड-अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घेतले ताब्यात
नवनाथ आडे (प्रतिनिधी, गेवराई) : बीडच्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. बीड-अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून खांडे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप 2 दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीडमध्ये पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलिसात 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता, याच गुन्ह्यात खांडे यांना अटक झाली आहे.
कुंडलिक खांडे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मदत न करता विरोधी उमेदवार बजरंग सोनावणे यांचे काम केले होते. याबाबत खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये खांडे यांनी या गोष्टीची कबुली देतानाच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केले होते. या क्लिपनंतर राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे नेते वाल्मिक कराड यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्या विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तसेच खांडे यांचा शोध घेण्यासाठी एलसीबी आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पथके रवाना झाली होती. अशातच जामखेड येथे कुंडलिक खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.