गावगुंडांनी केला दलितांवर कोयत्याने हल्ला , एक जण गंभीर
गेवराई तालुक्यातील घटना , 307 चा गुन्हा दाखल
गेवराई दि. 25 : वार्ताहर : तुम्ही हलक्या जातीच्या बाया असूनदेखील गोदापात्रात कपडे कसे काय धुता ? येथून चालते व्हा, नसता जीवे मारू ; अशी धमकी देणाऱ्या गाव गुंडाना जाब विचारण्यास गेलेल्या दलित कुटुंबावर गावगुंडांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुंत्तेगाव ता. गेवराई येथे 20 जूलै रोजी सायंकाळी सहा वाजता घडली असून, चकलांबा ता. गेवराई पोलिसांनी आरोपी विरूद्ध कलम 307 चा गुन्हा दाखल करुन काही आरोपींना अटक केली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या
संभाजी जगदीश पाखरे ( वय वर्ष 32 ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात दि. 21 जूलै रोजी पोलिसांना दिलेल्या जबाबात संभाजी जगदीश पाखरे ( वय 32 वर्षे व्यवसाय मजुरी रा . गुत्तेगाव ) यांनी असे सांगितले की, पत्नी नामे अनिता व अन्य एक नातेवाईक ह्या दोघी जणी
गोदावरी नदीवर कपडे धोवून रडत रडत घरी आल्या. त्यांनी सांगितले की , आम्ही नदीमध्ये धुवत असताना
भारत चितळकर , अनिकेत गोरडे, मनोज गोरडे, दत्तात्रय गोरडे आमच्याकडे आले व तुम्ही येथे कपडे धुवायचे नाहीत. असे म्हणुन शिवीगाळ करून तेथुन निघुन गेले.
असे पत्नी व भावजई यांनी सांगितल्याने मी त्यांचेकडे विचारपुस करण्यासाठी गेलो. असता त्यांनी मला तुम्ही लई माजलेत ‘ तुम्हाला संध्याकाळी दाखवतोत अशा धमक्या देऊन तेथुन निघुन गेले. त्यानंतर 20 जूलै रोजी संध्याकाळी सहा वाजता अचानक येऊन आमच्या घरावर हल्ला करून मला व माझे नातेवाईकांनी लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले व तेथून पळून गेले. दरम्यान, पाखरे यांना
गंभीर अवस्थेत , बीड येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून, तपास सुरू आहे. गावात आरोपी असलेल्या गावगुंडांची दहशत असून दलित कुटुंबावर अन्याय करणारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे.