बीड (प्रतिनिधी) दि.२३ : ‘आपण मराठा असल्यामुळेच मला उमेदवारी नाकारली,’ असा गंभीर आरोप स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे कार्यकर्ते प्रा.सचिन उबाळे यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यावर केला आहे. मात्र या आरोपांनंतर भाजपचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते विशाल मोरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. प्रा.उबाळे यांची सख्खी बहीण शितल दत्ता गायकवाड यांना भाजपकडून प्रभाग क्र.९ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. क्षीरसागर यांनी जातीयवाद केला, हा आरोप निराधार असल्याचे स्पष्ट होत आहे.
बीडमध्ये रविवारी (दि.२३) माध्यमांशी संवाद साधताना प्रा.उबाळे यांनी डॉ.क्षीरसागर यांच्या पक्षांतरावरही भाष्य केले. मात्र पक्षांतराची हीच बाब त्यांनाही लागू होते, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले. स्वतःला उमेदवारी न मिळाल्यानंतर ते अनाठायी आरोप करत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गत नगरपरिषद निवडणुकीत डॉ.क्षीरसागर यांनी प्रा.उबाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रभाग क्र. ८ मधून उमेदवारी दिली होती. परंतु त्यांना अल्पमते मिळाली. चालू निवडणुकीत मात्र त्यांनी उशिरा संपर्क साधल्याने उमेदवारी देताना अडचण निर्माण झाली. अशा वेळी त्यांच्या सख्ख्या बहिणी शितल गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. याशिवाय त्यांच्या सहकारी जयश्री मच्छिंद्र कुटे यांनाही उमेदवारी मिळाली असून दोन्ही उमेदवार मराठा समाजातील आहेत. त्यामुळे डॉ.क्षीरसागर यांच्यावरील जातीयवादाचे आरोप तथ्यहीन असल्याची पुष्टी होत आहे. तसेच, एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना उमेदवारी देणे शक्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींचे स्पष्ट धोरण आहे. त्यामुळेच प्रा.उबाळे यांना उमेदवारी देताना अडचण निर्माण झाल्याचेही सर्वश्रुत आहे. परंतु स्वतःला उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रा.उबाळे यांनी निराधार आरोप केले आहेत, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

भाजपने या निवडणुकीत अनेक मराठा समाजबांधवांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यावरील जातीयवादाचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट होते, असे भाजपचे कार्यकर्ते विशाल मोरे यांनी म्हटले आहे.

