◼️गवारे कुटुंबीयावर कोसळला दुःखाचा डोंगर; नागरिकांकडून हळहळ व्यक्त
गेवराई, महाराष्ट्र आरंभ वृत्त: छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाईक यांना भेटण्यास गेलेल्या गेवराई तालुक्यातील देवपिंपरी येथील एका वीस वर्षीय युवकाचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी दुपारी घडली आहे.
कृष्णा अंबादास गवारे (वय-२०) रा. देवपिंपरी, ता. गेवराई, जि. बीड असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी तो छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाईक यांना भेटण्यासाठी स्कुटीवरून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्याच्या स्कुटीला आज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात कृष्णा गवारे हा बेशुद्ध झाला.
बेशुद्ध अवस्थेतील दिसलेला युवक पहाता शहरातील नागरिकांनी १०८ नंबरवर फोन केला. यामुळेच घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल होऊन बेशुद्ध कृष्णाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगीतले.
त्याच्या पश्चात आई-वडिल, एक बहिण असा परिवार असून, कृष्णा हा एकूलता एक असल्याने गवारे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कृष्णाच्या अपघाती मृत्यूने देवपिंपरी गावातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.