◾नवनाथ आडे (प्रतिनिधी, गेवराई) : बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची काही दिवसांपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याशिवाय काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता. याच गुन्ह्यात शुक्रवारी सकाळी खांडे यांना अटक झाली. त्यानंतर आता पक्षविरोधी काम केल्याने खांडेंची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी तसे पत्र देखील काढले आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप चार दिवसांपूर्वी व्हायरल झाली आहे. यामध्ये आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केला असून बजरंग बाप्पांना मदत केली, असं संभाषण आहे. त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडेंवर देखील हल्ला करणार असल्याचं संभाषण आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी खांडे यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला होता. जामखेड येथे कुंडलिक खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्याला अटक केली.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खांडेंनी पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे खांडेंची शिंदे गटाच्या बीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.